चाकरमान्यांचा पुढाकार – गणेशोत्सव सत्कारणी, जलवर्धिनीचे मार्गदर्शन
रत्नागिरी : नाटे (ता. राजापूर) येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि वर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भराडीणवाडी (मधली वाडी) येथील ग्रामस्थांनी चाकरमान्यांच्या पुढाकारातून दहा हजार लिटर क्षमतेची फेरोसिमेंटची टाकी अवघ्या तीन दिवसांत बांधून पूर्ण केली. यावर्षीचा गणेशोत्सव चाकरमान्यांनी सत्कारणी लावला.
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे पाणी साठविण्याबाबत माहिती देतात. मुंबईतील वॉटर वर्क्स असोसिएशनचे ते सदस्य असून या संस्थेतही ते पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शन करतात. अत्यंत कमी खर्चात स्थानिक वस्तूंचा वापर करून फेरोसिमेंटची मजबूत टाक्या कशा बांधता येतात, याची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखविली. संस्थेचे एक कर्मचारी महादेव घाडी यांनी ही प्रात्यक्षिके अनेकदा पाहिली आणि आपल्या गावातही पाणी साठविण्याचा हा प्रयोग करायचे ठरविले. ती कल्पना त्यांनी गावातील मधली वाडी नवतरुण मंडळासमोर ठेवली. मंडळातील तरुणांनी ती उचलून धरली. वाडीतील २३ घरांसाठी पाणी योजना तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मंडळाचे मुंबईतील कार्यकर्ते गिरीश शिंदे तसेच इतर चाकरमानी आणि ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाला गावाला गेल्यानंतर टाकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले.